स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांचे निर्देश
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी (दि. ७) सदस्यांनी अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारपासून (दि. ११) शहरात एकही अनधिकृत फ्लेक्स दिसणार नाही. त्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेच्या संबधित अधिका-यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे दिली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत फ्लेक्सबाजीची चर्चा झाली. शहरात अनेक फ्लेक्स, होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. त्यातून शहराचे विद्रुपीकरण होते. पालिकेचे उत्पन्न बुडते. त्यामुळे शहरातील अनधिकृत जाहिरातींवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, आकाश परवाना विभागाचे सहायक आयुक्त योगेश कडूसकर बैठकीला गैरहजर राहत असल्याने त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी नगरसेवकांनी केली. चर्चेत नगरसेवक उत्तम केंदळे, राजू मिसाळ, अमित गावडे, आशा शेंडगे, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, यांनी मागणी केली.
त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबधित अधिका-यांनी सोमवारपार्यंत अशा जाहिराती काढून टाकाव्यात. फ्लेक्स जाहिराती न काढल्यास प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक आणि अतिक्रमण अधिका-यांवर कारवाई केली जाईल. राजकीय व्यक्तींवर करवाई होणार असून नियमानुसार नोटीस पाठविल्यास असे लोक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरू शकतात, असे सिमा सावळे यांनी सांगितले.