निर्भीडसत्ता न्यूज –
महाबळेश्वर / प्रतिनिधी
शिक्षकी पेशा हे पैसे कमाविण्याचे साधन नाही, तर एक प्रकारचे व्रत आहे, असे मानून ३१ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणा-या सरस्वती झोरे नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. या प्रसंगी नगरसेवक कुमार शिंदे यांनी गौरवोद्गार काढले.
केवळ पाठ्यपुस्तकातील धडेच नाही तर सरस्वती झोरे यांनी स्काऊट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले. स्काऊट गाईडमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावला आहे. तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे अनेक विद्यार्थी घडविले असल्याचे प्रतिपादन नगरसेवक कुमार शिंदे यांनी महाबळेश्वर व्यक्त केले.
महाबळेश्वरचे उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तहसिलदार अमिता तळेकर,वाईचे पोलीस उपनिरिक्षिक एडगे, प्रशालेचे प्राचार्य सरपाळे, माजी प्राचार्य गणपत कोरडे, विनायक पवार,तसेच डॉ.प्रकाश ठोके, उद्योजक विठ्ठलराव पोळ, आजी माजी विद्यार्थी आवर्जून या वेळी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना, सरस्वती झोरे म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली. त्याचे श्रेय पती बी.आर .झोरे यांना तसेच नातेवाईकांना जाते. पतीचे प्रोत्साहन आणि नातेवाईकांनी दिलेली खंबीर साथ यामुळे शिक्षण क्षेत्रात मला कार्य करण्याची संधी मिळाली. संस्थेत विद्यार्थी, शिक्षक सहकारी आणि स्टाफ यांच्याशी कुटूंबातील सदस्यांसारखे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे सेवेची अनेक वर्षे कशी निघून गेली कळलीच नाहीत. काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले, अनेक गोष्टी शिकता आल्या. अनुभव मिळाले, त्यामुळे सर्वांच्या ऋणात कायम राहू अशी कृतज्ञता त्यांनी व्यकत केली. उद्योजक म्हणुन नावलौकीक मिळविलेला मुलगा महेश यानेही आईच्या आठवणींना उजाळा दिला.
कन्या मंगल राजपूत हिने आईविषयीच्या भावना “आई तुज्याचसाठी” कवितेतून शब्दबद्ध केल्या.
आई तुज्याचसाठी रचिले हे काव्य…
लाभलीस बनूनी प्रेरणा आम्हास या जन्मी
असशी सदैव तू सोबती
बनुनी अद्भूत शाक्ती
बालपण गेले आमुचे हसत, खुशित
आई तुज्याच उबदार कुशीत
तारूण्यात बनलीस मार्गदर्शक सखी
आई कशी ग तू सदैव हसतमुखी
झालो जरी आज आम्ही माय बाप
तुज्यासाठी जणू अजूनही लेकरे निष्पाप
सोसलेस कष्ट जरी अपार
परी असशी तू शांत निर्विकार
तू नभातला शुक्रतारा
तू सदैव वाहणारा मायेचा झरा
तू ज्ञानाचा एक कल्पवृक्ष
तुज्या उत्तुंग यशाची आहोत आम्ही साक्ष
ढाल बनुनी लाभली तुला दादांची सोबत
अशीच असावी जोडी सदैव संगत
आम्हासाठी तुम्ही दोघे जणू आधारस्तंभ
तुमच्याविना आयुष्य आमुचे असंभव
जशी लाभली तुमची सोबत जरी आजवरी
अशीच असावी सदैव ती संगत आयुष्यभरी
नाही परी मी हाडाची कवियित्रीपरी, मांडली भावना भोळीभाबडी कवितेतून…