महापालिका पदाधिकारी, अधिका-यांच्या उपस्थितीत चाचणी
निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी-दापोडी बीआरटीएस मार्गावर बससेवा सुरु करण्यासाठी सुरक्षेसह सर्व तयारी महापालिका करत आहे. येत्या २ जानेवारी २०१८ रोजी या मार्गावर बीआरटी बससेवेची चाचणी सुरू केली जाणार आहे. महापौर, आयुक्तांसह सर्व पदाधिकारी व संबधित अधिकारी या चाचणीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
निगती ते दापोडी बीआरटी मार्गाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बुधवारी (दि. २७) बैठक पार पडली. या प्रसंगी महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक तुषार कामठे, राहूल जाधव, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते. त्याबाबत माहिती देताना एकनाथ पवार म्हणाले, महापालिकेने नाशिक फाटा ते वाकड, सांगवी फाटा ते किवळे या बीआरटी मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निगडी-दापोडी बीआरटी मार्ग सुरु करण्याचा प्रयत्न आहे. निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर बीआरटी सुरु करण्यासाठी मुंबई आयआयटी विभागाच्या पथकांने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अहवाल तयार करुन दिला होता. या मार्गावरील बस स्थानके बांधण्याचे काम सहा आठवड्यात पुर्ण झाले आहे. प्रत्येक बस स्टेशनला नागरिकांना ये-जा करण्यासाठी सहा जंक्शनला सिग्नल व्यवस्था, वाहतुक पोलिस, ट्रॉफिक वॉर्डन, नो पार्किंग झोन तत्काळ करण्यात आले आहेत. यासह वाहतुक इंजिनिअरच्या सल्लागाराकडून सर्व कामे पुर्ण केलेली आहेत.
निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी सुरक्षेमुळे वाहतूक नियोजन महत्त्वाचा विषय आहे. बस स्टेशनवर नागरिकांना ये-जा सुरक्षितरित्या करता यावी. सिग्नल व्यवस्था कडकपणे राबवावी. या उद्देशाने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र संस्था नेमण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावून ट्रॉफीकचा प्रश्नही निकाली काढला जाणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली. या मार्गावरील थिसेनक्रुप चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत रस्त्यावरील ट्रॉफीकचा प्रश्न मोठा आहे. पर्यायी जागा उपलब्ध करुन रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात येणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्गावरील जवळपास सगळे प्रश्न सुटलेले आहेत, असे पवार यांनी सांगितले.