पिंपळेसौदागरमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळे सौदागरचा परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पिंपळे सौदागर प्रभागाचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु आहेत. आज सोमवारी (दि.1) नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, पिंपरी चिंचवड महापलिकेचे आरोग्य अधिकारी विनोद भेंडाळे, श्रीराम गायकवाड, राकेश सौदाई, संतोष मसकर, सिद्धार्थ नाईक यांनी व्यापारी, सोसायटी परिसराला भेट देवून प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कागदी बॅग्ज वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले की, प्लास्टिक बॅग्जपासून होणारं पर्यावरणाचं नुकसान आज सर्वानाच माहीत आहे. आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅग, थैली किंवा पातळ पिशवीच्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. म्हणून स्वता: पुढाकार घेवून परिसरातील प्लॅस्टिकमुक्तमुळे पर्यावरणाचे आपणच रक्षण करू शकतो असे नगरसेवक काटे म्हणाले.
प्लॅस्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून पिंपळे सौदागर परिसरात प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याबबत येथील व्यापारी, दुकानदारांना आवाहन करण्यात आले होते. यामध्ये सोसायटी परिसरात स्टिकरच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या वापरू नयेत याबाबत जनजागृती नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आज सोमवार दि. १ जानेवारी पासून प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली असून या विषयी दुकानदारांची भेट घेऊन पालिका आरोग्य अधिका-यांनी चर्चा केली. आजपासून प्लास्टिक बॅग वापरण्यावर दंड वसूल केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकारी, नगरसेवकांच्या आवाहनास दुकानदार, व्यापारी, सोसायट्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेकांनी कागदी पिशवी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
—————————————————————-
पिंपरी चिंचवड शह रात प्रथमच प्लास्टिक बंदीचा एक चांगला उपक्रम मागील पंधरा दिवसापासून पिंपळे सौदागर परिसरात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात परिसरातील नागरिक, व्यापारी, दुकानदारांनी सहभाग नोंदवावा.
विठ्ठल उर्फ नाना काटे – नगरसेवक