निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अंतर्गत वादाचा परिणाम रुग्ण सेवेवर होवून पालिकेची बदनामी होवू लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिक्षक आणि प्रस्तावित महाविद्यालयाचे कामकाज पाहणाऱ्या डॉक्टरांना एकत्रित बोलावून दोघांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झापझाप झापले आहे. तसेच यापुढे वाद केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, वायसीएम महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्याकर पंडीत यांच्या समवेत गोपनीय बैठक घेवून दमदाटी केल्याच्या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
डॉ. देशमुख यांना दमदाटी झाल्याने रुग्णालयातील काही डॉक्टरांनी प्रवेशद्वारासमोर डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची निषेध सभा घेतली होती. संबंधित महाविद्यालयाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालयात काळ्या फिती लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता. या प्रकरणामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रमुख डॉक्टरांना एकत्रित बोलावून रुग्णालयात चाललेली गटबाजी, डॉक्टरांचे अंतर्गत राजकारण, एकमेकांवर होणाऱ्या कुरघोड्या, यामूळे महापालिकेचे बदनामी होत आहे. रुग्णालयात कामे करताना समन्वय ठेवून कामे करा, वैद्यकीय विभागातील अंतर्गत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. यापुढे कोणीही गटबाजी करुन आंदोलन करेल, त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही पुर्वसूचना प्रशासनाकडे दिली नव्हती, तसेच विनापरवाना आंदोलन करुन कर्मचा-यांना वेठीस धरत काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला. दोषी कारवाई करु, असे सांगणारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित डॉक्टरांना क्लिचीट दिल्याचे बोलले जात आहे.