निर्भीडसत्ता न्यूज –
भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन साजरा करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांची जाळपोळ केल्याच्या घटनेचे पिंपरी-चिंचवडमध्येही तीव्र पडसाद उमटले. आंबेडकरी जनतेने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. त्यामुळे चौकात प्रचंड वाहतूककोंडी झाली.
वाहने जागेवरच थांबविण्यात आल्यामुळे पिंपरी कॅम्प, नेहरूनगर, निगडी आणि दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी शौर्यदिन पाळला जातो. राज्यभरातून आंबेडकरी जनता भीमा कोरेगाव येथील स्तंभाला वंदन करण्यासाठी जाते. भीमा कोरेगावकडे जाणारी वाहने पुणे-नगर मार्गावरील सणसवाडीजवळ जाळण्यात आली. तसेच अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शहरातील आंबेडकरी जनतेने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध केला.
या आंदोलनामुळे चौकात प्रचंड वाहतूककोंडी झाली. वाहने जागेवरच थांबविण्यात आल्यामुळे पिंपरी कॅम्प, नेहरूनगर, निगडी आणि दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.