निर्भीडसत्ता न्यूज –
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या मनपा व खाजगी शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरण संवर्धन समितीचे सदस्य, मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी शहरात प्रभात फेरी काढून स्वच्छता विषयक जनजागृती केली.
यावेळी स्वच्छ भारत-स्वस्थ भारत, स्वच्छ भारत-सुंदर भारत, स्वच्छता राखा आरोग्य संभाळा अशा प्रकारचे जनजागृती व संदेशाचे फलक घेऊन घोषणा देण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अशा प्रकारच्या रॅल्यांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध शाळांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.
क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नेहरुनगर येथील राजीवगांधी महाविद्यालय, कन्या शाळा व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरात रॅली काढून जनजागृती केली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक रमेश भोसले आदी उपस्थित होते. ग क्षेत्रीय कार्यालय व ईसीए यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, ग क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, सहाय्यक आरोग्य अधिकारी एस. एस. कुलकर्णी, विकास पाटील व त्याचे सहकारी, कागद काच, पत्रा वेचक कष्टकरी संघटनेच्या सोनाली कुंजीर आदी उपस्थित होते.