निर्भीडसत्ता न्यूज –
राज्य सरकाने अधिसूचना जाहिर केल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. परंतु, या प्रक्रियेला अनधिकृत बांधकामधारकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह नगरसेवकांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त बांधकामे नियमित होण्यासाठी नियमितीकरणाची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची ग्वाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
नियमितीकरणासाठी दोन महिन्यात केवळ सात अर्ज पालिकेला मिळाले. त्यामुळे अवैध बांधकामे निमयितीकरणाच्या प्रक्रियेबाबत महापालिकेत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, मोनाली कुलकर्णी यांनी आयुक्त हर्डीकर व बांधकाम परवाना विभागाच्या अधिका-यांची गुरुवारी (दि.१८) उशिरा एक बैठक घेतली.
या बैठकीत बांधकाम नियमितीकरणाच्या प्रक्रियेतील अटी, शर्ती व किचकट अडथळ्यांवर चर्चा झाली. निर्णयाचा व या प्रक्रियेचा जास्तीत नागरिकांना लाभ मिळावा. यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्यात ठरवलेल्या नियमावलीत व प्रक्रियेत काही बदल करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.