निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी महापालिकेने शहरातील दररोज १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणा-या हौसिंग सोसायट्यांकडून १ एप्रिल २०१७ पासून कचरा न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. या सोसायट्यांना आपला ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था स्वत:च करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्या सोसायटींमधील केवळ सुका कचरा महापालिका वाहनांमधून स्विकारला जाणार आहे. पालिकेने शहरातील हौसिंग सोसायटी, हॉटेल, मंगल कार्यालये, खानावळ, वसतिगृह, उपाहारगृह, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना ओला कचरा निर्माण झालेल्या ठिकाणी प्रक्रियेची यंत्रणा उभा करण्यासाठी बंधनकारक केले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यासाठी ७५ पेक्षा जास्त सदनिका असणा-या हौसिंग सोसायट्यांसह व इतर आस्थापनांना जनजागृतीपर पत्र प्रभाग कार्यालयांमार्फत पाठविण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे नागरिकांना कायदेशीर बंधनकारक आहे. त्यानुसार प्रथम सोसायट्यांसाठी पालिकेने हे बंधनकारक केले आहे. दररोज १०० किलो ओला कचरा निर्माण होणा-या हौसिंग सोसायट्या व इतर आस्थापनांकडून १ एप्रिलपासून ओला कचरा स्विकारला जाणार नाही, असे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. तसेच, कचरा विलगीकरण करणे व ओल्या कच-यावर निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांनी सांगितले.