निर्भीड न्यूज –
हनुमान जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीगाव, चिंचवडगाव, चिखली, भोसरी, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आदी ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. पहाटेपासूनच हनुमान मंदिरांत दर्शनासाठी गर्दी झाली होती. काही मंदिरांत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पिंपरीगावातील दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्म सोहळा साजरा करण्यात आला. दक्षिणमुखी श्री हनुमान व हभप जोग महाराज सेवा ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचा 14 वा वर्धापनदिनानिमित्त कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान हा महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवादरम्यान शुक्रवार, दि. 22 एप्रिल रोजी पहाटे महाअभिषेक आणि हनुमान जन्म सोहळा झाला. त्यानंतर भजनांचा कार्यक्रम झाला. सकाळी दहा वाजता आळंदी येथील श्रीमद् भागवत कथाकार नानामहाराज सूर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आमदार गौतम चाबूकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, उद्योजक संदीप वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे शहराध्यक्ष सुनील कुंजीर, ट्रस्टचे अध्यक्ष परशुराम वाघेरे, उपाध्यक्ष दिगंबर वाघेरे, सेक्रेटरी रमेश वाघेरे, खजिनदार नामदेव महानवर, जगन्नाथ शिंदे, कृष्णा वाघेरे आदी या वेळी उपस्थित होते.