मेढा / प्रतिनिधी – सोमनाथ साखरे
निर्भीडसत्ता न्यूज –
मांढरदेवीची बहिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील श्री श्रेत्र कुसूंबी येथिल श्री काळेश्वरी यात्रेस दि. ३१ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रा कालावधीत भाविकांना सोयीसुविधा पुराविणार असल्याचे सरपंच पुष्पा चिकणे यांनी सांगितले.
कुसुंबी येथिल श्री काळेश्वरी भविकांचे आशास्थान असून या यात्रेस महाराष्ट्रातून अनेक जिल्हयातील भाविक देवीच्या दर्शनास येत असतात. हजारो भाविकांचा साक्षीने ही श्री काळेश्वरी देवीची मुख्य यात्रा दि. २ व ३ फेब्रुवारी रोजी संपन्न होत असते. यात्रेस भाविक मोठी गर्दी करीत असल्याने ग्रामपंचायतीमार्फत सुविधा पुरविणार असल्याचे सरपंच पुष्पा चिकणे यांनी सांगितले.
श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेस येणाऱ्या दुकानासाठी मंदिरासमोरच्या शेतामध्ये जागा आरक्षित करण्यात आली असून दुकानदारांनी जागेबाबत ग्रामपंचायत व श्री काळेश्वरी देवी विश्वस्त यांच्याशी संपर्क साधून आपली जागा निश्चित करून घ्यावी. आरक्षित जागे व्यतिरिक्त कुठेही कोणी दुकाने मांडून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंच पुष्पा चिकणे यांनी केले आहे.
श्री काळेश्वरी यात्रेस सातारा व मेढा येथिल बसस्थानकातून जागा बसेस सोडण्यासाठी आगार प्रमुखांना कळविण्यात आले असल्याने भाविकांनी खाजगी वाहनापेक्षा एसटीने प्रवास करावा असेही सौ.पुष्पा चिकणे यांनी सांगितले.
तसेच यात्रा कालावधीत प्रशासनाच्या असलेल्या नियमांचे सर्व भाविकांनी पालन करावे. भाविकांच्या आरोग्याची पुर्णपणे मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात येईल. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळविकात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांनी सहकार्य करावे तसेच भाविकांना कोणत्याही अडचणी असल्यास त्यांनी ग्रामपंचायत, पोलीस, काळेश्वरी विश्वस्त मंडळ यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन सरपंच पुष्पा चिकणे यांनी केले आहे.