निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात 252 कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-यांनी बोलू नये, असे प्रत्युत्तर महापौर नितीन काळजे व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले आहे.
यापुर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असताना कचऱ्याच्या कामामध्ये सुसूत्रता नव्हती, अनागोंदी कारभार सुरु होता त्यामुळे सातत्त्याने कचऱ्याची गंभीर समस्या होत आहे. सत्तेत सआल्यानंतर भाजपने लोकांशी निगडीत असलेली दैनंदिन समस्या हद्दपार करणेसाठी हा प्रयत्न सुरु केला आहे. अनेक ठेकेदारांना कचरा गोळा करुन तो कचरा डेपोपर्यंत वाहुन नेणेसाठी काम दिले जात होते. भाजपने दोन ठेकेदारांना काम देणेच्या सुचना प्रशासनाला केल्या त्याप्रमाणे या निविदा प्रक्रिया राबविणेत येत आहेत. शहरात कचऱ्याच्या समस्या उदभवनार नाही व वेळोवेळी कचरा उचलला जावा यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचा हा प्रयत्न भाजपचा आहे. त्याला खोडा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत शितोळे आणि इतर लोक निविदा प्रक्रिया पुर्ण होण्याआधीच भाजपवर आरोप करीत आहे. कामाचे स्वरुप, कामाचा आवाका यासाठी लागणारी यंत्रणा, मनुष्यबळ या सगळ्या बाबींचा या निविदा प्रक्रियेत समावेश आहे.
राष्ट्रवादीनेच बी.व्ही.जी. ला अनेक कामे दिली होती. तसेच सांगवीतील गॅस शवदाहिनी बसविणेच्या कामात राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करुन मृतांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा प्रकार केलेला आहे. त्यावर पांघरुन घालण्यासाठी आरोपांचा हा केविलवाणा प्रकार राष्ट्रवादीकडुन होत आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. बीव्हीजी ही ठेकेदार संस्था राष्ट्रवादीची पिलावळ आहे. बीव्हीजीला राष्ट्रवादीने पालिकेला आंदण दिले आहे.
पालिकेच्या सर्वंच विभागातील कामे बीव्हीजीला दिली आहेत. या कामाबाबत महापालिका आयुक्त सविस्तर खुलासा करतील. राष्ट्रवादीने भाजपची बदनामी थांबवावी. अन्यथा राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढली जातील, असा इशाराच महापौर काळजे आणि सभागृह नेते पवार यांनी दिला आहे.