निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य लकी ड्रॉमधून बुधवारी (दि. ७) बाहेर पडणार आहेत. समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 नगरसेवकांच्या नावे चिठ्ठ्यांव्दारे काढली जाणार आहेत.
स्थायी समितीमध्ये भाजपकडून अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे १६ सदस्य आहेत. महापालिका स्थायी समितीत 16 सदस्य असून त्यापैकी 8 जण बाहेर पडणार आहेत. निवडणुकीनंतर पहिल्या वर्षात आठ जण निवृत्त होतात.
बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागेवर आगामी महापालिका सभेत नव्याने आठ सदस्य निवडले जातील. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली होणा-या सभेत हा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. सत्ताधारी भाजपमध्ये स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा जणांना एक एक वर्ष संधी देण्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून काय निर्णय घेतला जाणार, हे पाहावे लागणार आहे. स्थायी समितीत सध्या भाजप दहा, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसेना एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे.