निर्भीडसत्ता – पक्षाच्या सुचनेनुसार भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते नाराज नसून त्यांच्या जागी आश्विनी बोबडे यांना विधी समितीवर संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
एकनाथ पवार म्हणाले की, महानगरपालिका सर्वसाधारण सभेत आश्विनी बोबडे यांनी विधी समितीवर निवड होण्याची इच्छा व्यक्त करीत क्रीडा समितीचा राजीनामा दिला होता. त्याचा विचार करून त्यांना विधी समितीवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षातील नेते मंडळी व पक्षाच्या सुचनेप्रमाणे वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
वसंत बोराटे नाराज असल्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. परंतु ते बरोबर नसून पक्षातील समजुतदारपणामुळे बोराटे यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याचा कोणताही वेगळा अर्थ कोणी काढू नये, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.