निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरातील जलनिःस्सारणाची 82 टक्के कामे पुर्ण झाली असून उर्वरीत कामे सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सांडपाण्यावर प्रक्रिया करुन महापालिकेकडून त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. मात्र काही झोपडपट्ट्या आणि खडकाळ भागात जलनिःस्सारण नलिका टाकण्यात अडचणी येत आहेत. वाहत असणाऱ्या पाण्यामुळे होणारी दुर्गंधी, डासाचा त्रास टाळण्यासाठी आणि शहरातील स्वच्छतेसाठी महापालिकेने शहरात सांडपाणी वाहिन्या टाकल्या आहेत. त्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशी जोडल्या. मात्र नवीन वस्ती आणि नवी बांधकामे झालेल्या भागात आणि काही झोपडपट्टयांमध्ये वाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे.
आनंदनगर सारख्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उंच भागावर असून वस्ती सखल भागात आहे. अशा ठिकाणचे सांडपाणी प्रकल्पापर्यंत नेण्यास अडचणी येत आहे. तसेच काही भाग खडकाळ असून काही झोपडपट्ट्या खासगी जागेवर आहेत. काही झोपडपट्ट्यांमधील गल्ल्या अरुंद असून त्यामुळे खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत. पर्यायी मार्ग अवलंबविण्याबाबतचा विचार सुरु असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.