निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरस्त्यावर नदी, लोहमार्ग व महामार्ग आेलांडणा-या उड्डाणपुलाचे अखेर लोकार्पण झाले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते आज (सोमवारी) झाले आहे. त्यानंतर हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
खासदार अमर साबळे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापाैर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) 11 किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड-एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी आता पुलाचे काम पुर्ण झाले आहे.
बीआरटीएसच्या कामातील पवना नदी, मुंबई-पुणे रेल्वे आणि पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणारा उड्डाणपूल एम्पायर इस्टेट येथे बांधण्यात आला आहे. तो १.६० किलोमीटर लांबीचा आणि नदी, महामार्ग अडथळे ओलांडून जाणारा आहे. त्याची रुंदी २३ ते ३० मीटर आहे. या मार्गाच्या आखणीत स्वतंत्र बीआरटी लेन आणि इतर वाहनांसाठी ५.५ ते ७ मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गाचा समावेश आहे. पादचाऱ्यांसाठी पवना नदी व रेल्वेवरील पुलावर स्वतंत्र दोन मीटरचा मार्ग तसेच चारही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिन्यांची सोय करण्यात आली आहे. उड्डाणपुलामध्ये १.८ मीटर रुंदीचा पादचारी आणि सायकलसाठी स्वतंत्र मार्ग राखीव आहे. पादचारी व सायकलवरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचे अंटिक क्रॅशन रेलिंग आहे. हा उड्डाणपूल निवासी भागातून येत असल्याने तेथील रहिवाशांचा विचार करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नॉईज बॅरिअर्सचा समावेश करण्यात आला आहे.
येत्या सोमवारीपासून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला झाला असून या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण करण्यात आले आहे.