निर्भीडसत्ता न्यूज –
आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या विद्यमाने कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये आज, शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात जुनी सांगवी येथील प्रवीण जाधव या तरूणास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. तसेच प्रविण यास संजय गांधी योजने अंतर्गत शासनाची पेंशन सुरू करण्यात आली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा दिव्यांगांचे हात-पाय याचे मोजमाप घेऊन कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात येणार आहे.
शहर प्रवक्ते अमोल थोरात, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास पाटिल, प्रमोद ताम्हणकर, अदिती निकम, आकाश वाघमारे आदि उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, सामान्य जीवन जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव हवेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात, पाय यासारखे महत्त्वपूर्ण अवयव गमवावे लागतात. मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर अख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. दिव्यांग व्यक्ती शरीराने अधू असल्या तरी त्या मनाने कुठेही खचलेल्या दिसत नसतात. समाजातील अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगतापट्रस्ट समाजातील पिडितांना मोफत मदत करत आहे.
कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस मदतीची आवश्यकता असेल तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.