निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये विलीन न करता पिंपरी चिंचवड महापालिकेत विलीन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये विलीन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही देखील लवकर पूर्ण केली जाणार. एकाच शहरात दोन स्वायत्त संस्था नको या भूमिकेतून हा निर्णय घेतला आहे असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मालमत्ता, भूखंड, आणि पैश्यांवर डोळा ठेवून पिंपरी चिंचवड करांच्या मालमत्तेवर दरोडा टाकण्याच्या हेतूने एकाच शहरात दोन स्वायत्त संस्था नको या भूमिकेतून हा निर्णय घेतला आहे. खरेतर या शहरात एम.आय.डी.सी, म्हाडा, देहूरोड-खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व प्राधिकरण अशा वेग वेगळ्या स्वायत्त संस्था असताना पालकमंत्र्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्या आघात ज्ञानाची प्रचीती देते.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी सार्वजनिक वाहतूक सुलभ व्हावी म्हणून पीसीएमटी व पीएमटी यांचे विलिनी कारण करून “पुणे महानगर परिवहन महामंडळाची” स्थापना केली. त्यात “पिंपरी चिंचवडचे” नाव समाविष्ट केले नाही. परंतु अनुदान घेताना पुणे महापालिकेच्या तुलनेत पिंपरी महापालिकेकडून जादा अनुदान घेण्यात येते. सर्वच बाबतीत आमच्या शहराशी दुजाभाव केला जातो. स्वारगेट ते पिंपरी मेट्रो होत असताना “पुणे मेट्रो कॉर्पोरेशन” अशा नावाने होत आहे. त्यातही “पिंपरी चिंचवडचे” नाव समाविष्ट केले नाही. आमची निगडी पर्यंत मेट्रो प्रकल्प व्हावा अशी मागणी असताना त्या खर्चाचा भृदंड पिंपरी चिंचवड करांच्या माथी मारण्याचा डाव पालकमंत्र्यांचा आहे.
प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन न करता प्राधिकरणाचा भौगोलिक दृष्ट्या पिंपरी महापालिकेच्या हद्दीत येतो त्यामुळे प्राधिकरण पीएमआरडीएत नको तर पालिकेत विलीन करण्यात यावे, असे भापकर यांनी म्हटले आहे.