निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजने अंतर्गत अवजारे खरेदी करण्यासाठी बांधकाम कामगारांना खासदार बारणे यांच्या हस्ते अर्थसहाय्य करण्यात आले. कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये 200 कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी खासदार बारणे बोलत होते. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, अप्पर कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ, सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले, सरकारी अधिकारी यास्मिन शेख, मुजावर, संगीता कळमकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपसभापती शरद हुलावले, सरपंच सागर हुलावळे, सुदाम हुलावळे, विष्णू हुलावळे, तोफील शेख, रवी जंगम, महेश दळवी, गोविंद वायकर, विकास वायकर, दिलीप भालेराव, अनंता यादव, गिरीश सातकर, उपतालुकाप्रमुख मदन शिर्के, बब्रु ठोंबरे, महिला तालुकाध्यक्षा आशा देशमुख, तालुका सल्लागार भारत ठाकूर, माजी उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, भिवाजी वाजी वाटेकर, परेश मोरे, प्रवीण जाधव, शरद हुलावळे, उज्वला गर्जे, महेश हुलावळे, सुनील जवळकर, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, दत्तगीर मणियार, तुकाराम हुलावळे, अजय ठोंबरे, प्रितेश शिंदे, प्रदीप धामणकर आदी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, बांधकामांना परवानगी देताना नियोजित बांधकामाच्या खर्चाच्या एक टक्का रक्कम ‘सेझ’ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जमा करण्यात येते. हा जमा होणारा पैसा कामगारांच्या हितासाठी वापरण्यात यावा, असा शासनाचा मानस आहे. मात्र हा पैसा कामगारांना मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. त्यामुळे सध्या शासनाकडे ‘सेझ’अंतर्गत 10 हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र, त्याचा लाभ कामगारांना व्हावा यासाठी शासनाची उदासिनता दिसून येत आहे. हा निधी तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना सातत्याने कटिबद्ध राहील, असा विश्वास देखील बारणे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, “महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बांधकाम साईटवर जाऊन कामगारांची नोंदणी केली आहे. त्यामुळे केवळ गरजू आणि ख-या कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीकृत कामगारांसोबत संघटना सातत्याने संपर्क करीत आहे. त्यांच्या अडचणींना सोडविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. संघटना केवळ कामगारांसाठी न लढता त्यांच्या कुटुंबीयांना देखील विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पुस्तक खरेदीसाठी मदत तसेच व्यसनमुक्ती आणि साक्षरता वर्ग देखील चालविले जात आहेत. कामगारांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. अप्पर कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ यांनी शासनाकडून कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच सर्व कामगारांनी शासनाकडे नोंदणी करावी, ज्यामुळे त्यांना वेळोवेळी शासनाकडून मदत मिळू शकेल, असेही वाघ म्हणाले. सर्जेराव कचरे यांनी प्रास्ताविक केले. उज्वला गर्जे यांनी आभार मानले.