निर्भीडसत्ता न्यूज –
वाकड येथे गॅससिलेंडरचा स्फोट झाल्याने बांधकाम मजूरांच्या पाच झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वाकडमधील कस्पटेवस्ती येथे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकड येथील कस्पटे वस्तीमधील दत्त मंदिराजवळ काही बांधकाम मजूर झोपडया टाकून राहतात. आज सकाळी सर्व कामगार कामावर गेले असता एका झोपडीतील गॅस लिकेज झाल्याने सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे परिसरातील जवळपास पाच झोपड्यांना आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि राहटणी अग्निशमन केंद्राचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने सर्व झोपड्या मोकळ्या होत्या. बांधकाम मजूर कामावर गेले होते म्हणून मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीमध्ये जवळपास पाच झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.