निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चारही बाजूने लष्कराची हद्द आहे. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतून जाणारे रस्ते व इतर सुविधांबाबतचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षण खात्याकडे सतत पाठ्पुरावा केला आहे.
बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळेसौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.
आमदार जगताप यांनी बोपखेल ग्रामस्थांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे धाव घेतली होती. दिल्ली येथे संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बोपखेल ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती.
याशिवाय पिंपळेसौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून जाणारा रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणीही आमदार जगताप यांनी संरक्षणमंत्री यांच्याकडे केली होती. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी बोपखेलवासीयांसाठी पर्यायी रस्ता आणि रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्त्याबाबत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
नुकतेच केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी कँटोन्मेंटमधील बंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील कँटोन्मेंटच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नुकतीच बैठक घेतली. त्यानंतर काही दिवसांतच कँटोन्मेंटमधील बंद रस्ते खुले करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत्. त्यानुसार स्थानिक लष्करी प्रशासनाने मंगळवारी सकाळी पुणे कँटोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लँक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळेसौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना लेखी निवेदनाव्दारे केली आहे.