निर्भीडसत्ता न्यूज –
कामशेत येथील हॉटेल राजवाडामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या चिंचवड येथील निहाल नानेकरची गोळ्या झाडून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी (दि. १०) रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली. चिंचवड येथील विकी घोलप टोळीचा तो सदस्य असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, निहाल त्याच्या दोन मित्रांसोबत कामशेत येथील राजवाडा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण सुरू असताना त्यांच्यामध्ये आकाश लांडगे याचा विषय सुरू झाला. सोमवारी (दि. 11) आकाशचा बारावा विधी आहे. अशी चर्चा झाल्यानंतर निहालला आकाशच्या खुनाचे दुःख सहन झाले नाही. निहालने स्वतःच्या कमरेला असलेल्या पिस्टल मधून स्वतःवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या डोक्याला लागली. यामध्ये निहाल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ चिंचवड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निहालने मित्राच्या आठवणीतच हा प्रकार केल्याची चर्चा सध्या चिंचवड परिसरात सूरु आहे.