निर्भीडसत्ता न्यूज –
महाराणा प्रतापसिंह यांच्या 478व्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीतील महाराणा प्रतापसिंह उद्यानात मेघडंबरीचे शनिवारी (दि. 16) सकाळी 11 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आकुर्डीतील खंडोबामाळ चौकातून सकाळी 8 वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. निगडीतील महाराणा प्रतापसिंह उद्यानात यात्रेचा समारोप होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि समस्त राजपूत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटनविकास व स्वयंरोजगार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महापौर नितीन काळजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. पिंपरी-चिंचवड महानगर समस्त राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांनी याबाबत माहिती दिली आहे. पालकमंत्री गिरीष बापट, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, सुप्रिया सुळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेता दत्ता साने, माजी महापौर कविचंद भाट, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, राजपूत समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी, भाजपाच्या उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजन परदेशी, युवा राजपूत प्रतिष्ठानचे पुणे शहराध्यक्ष किशोरसिंह गिरासे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
निगडीतील महाराणा प्रतापसिंह उद्यानात महाराणा प्रतापसिंह यांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी राजस्थानी संस्कृतिची ओळख दर्शविणारी मेघडंबरी उभारण्यात आली आहे. या मेघडंबरीचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. आकुर्डी येथून काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेतील पालखीत महाराणा प्रताप, राणी पद्यमिनी देवी, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषांच्या जन्मभूमी व कर्मभूमीची पवित्र मातीचे मंगल कलश असणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या478व्या जयंतीनिमित्त 478 झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. 15) सकाळी सात वाजता भंडारा डोंगर येथून करण्यात येणार आहे.
राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड महानगर, युवा राजपूत प्रतिष्ठान, महाराणा प्रतापसिंह विचारमंच संघटना, राजस्थानी राजपूत समाज आदी संघटनांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे. बिग इंडिया ग्रुपचे व्यवस्थापक नरेंद्रसिंह सेंगर यांनी सहकार्य केले आहे.