निर्भीड न्यूज –
पिंपरीगाव येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांचा सार्वजनिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त बुधवार, दि, 11 मे कुस्त्यांचा आखाडा झाला. यात सुमारे दोनशे पैलवानांनी सहभाग घेत आखाडा गाजवला. तीन निकाली कुस्त्यांनी आखाड्याचा समारोप झाला.
काळभैरवनाथ उत्सवानिमित्त पिंपरीगावात पारंपरिक पध्दतीने कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव समिती आणि समस्त पिंपरीगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर कुस्त्या झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष महापालिकेचे माजी विरोधी पक्षेनेते दत्तात्रय वाघेरे, महापालिकेचे माजी स्वीकृत सदस्य नरहरी कापसे, शुभम उद्योगचे संचालक हनुमंत ऊर्फ बाळासाहेब वाघेरे, राष्ट्रीय खेळाडू मावळ केसरी पै. खंडू वाळूंज, महाराष्ट्र चॅम्पियन पै. निवृत्ती काकडे, पै. राजू जाधव, पै. दिलीप बारणे, संतोष माचुत्रे आदी या वेळी उपस्थित होते.
सुमारे दोनशे पैलवानांनी यात सहभाग घेतला. कुस्तीचे सुमारे शंभर सामने या वेळी झाले. पारंपरिक पध्दतीने आखाडा भरविण्यात आल्याने यात सर्वच वजन गटातील पैलवानांचा सहभाग होता. बाल पैलवानांनीही आखाड्याची रंगत वाढविली. यातील प्रत्येक पैलवानाला बक्षीस देण्यात आले. तीन निकाली कुस्त्यांनी आखाड्याचा समारोप झाला. राष्ट्रीय खेळाडू अभिषेक फुगे आणि अक्षय यादव यांच्यात शेवटची कुस्ती झाली. फुगे आणि यादव यांनी सामना रोमहर्षक केला. अखेरीस ही शेवटची कुस्ती अनिर्णित राहून बरोबरीत सोडविण्यात आली. त्यामुळे प्रत्येकी दहा हजार या प्रमाणे फुगे आणि यादव या दोन्ही स्पर्धकांना वीस हजार रुपयांची बक्षिसी देण्यात आली.
उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वाघेरे, उपाध्यक्ष दत्तात्रय चिंधाजी वाघेरे, पै. लक्ष्मण आढाळे, संदीप कापसे, धनराज ठाकूर, वस्ताद नथू शिंदे, राजाराम कदम, दत्तोबा नाणेकर, शांताराम वाघेरे, विलास लोहार, बाळासाहेब वाघेरे, विलास वाघेरे, सुजित कदम, ज्ञानेश्वर कलापुरे, अशोक वाघेरे, शंकर वाघेरे यांनी आखाड्याचे नियोजन केले.
चंद्रकांत कदम, अण्णा कापसे, सुदाम वाघेरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. संदीप गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.