निर्भीडसत्ता न्यूज –
मल्टीप्लेक्समध्ये शितपेय व पाणी बॉटल यांची छापील दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास तात्काळ वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहाय्यक नियंत्रक नि.प्र.उदमले यांनी केले आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री गिरीष बापट यांनी वैधमापन शास्त्र विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मल्टीप्लेक्स, हॉटेल, मॉल्स व सिनेमागृहामधील आवेष्टित वस्तु, इतर खाद्य पदार्थ यांची वैधमापनशास्त्र अधिनियम 2009 अंतर्गत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने 6 ऑगस्ट रोजी वेस्टइंड मॉल औंध, सिटी प्राईड सिनेमा गृह कोथरुड, के एफ सी, वर्गर किंग इंडिया प्रा लि.औंध, साफिरे फुडस इंडिया प्रा.लि., सिजन मॉल, ॲमनोरा मॉल यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सिनेपेलिस सिनेमा,आयनॉक्स थिएटर मधील आवेष्ठित वस्तु व इतर खाद्य पदार्थ जे पॅकेजिंग मध्ये विकले जातात त्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी मोहिम पुढील कालावधीसाठीही चालूच राहणार असून मल्टीप्लेक्समध्ये शितपेय व पाणी बॉटल यांची छापील दारापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास तात्काळ तक्रार दाखल करावी. तक्रारीसाठी संपर्क दुरध्वनी 020-26137114 ईमेल आयडी aclmpune@yahoo.in हा आहे,असेही श्री.उदमले यांनी कळविले आहे.