निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव मुक्तीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय महापालिका शिक्षण समितीच्या गुरुवारी (दि.१६) बैठकीत घेण्यात आला.
सभापती प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ही बैठक झाली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ ऑगस्ट २०१८ रोजी अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा ताणमुक्त अभ्यास व परिक्षेतील ताण कमी करण्यासाठी लोणावळ्यातील मनशक्ती प्रयोग केंद्रामार्फत नि:शुल्क कार्यक्रम राबविले जातात. सर्व शाळांनी हे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शासनाच्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
त्यामध्ये मनशक्ती केंद्रातील नि:स्वार्थ युवा कार्यकर्ते डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षणतत्र, विचारवंत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्रामुख्याने मेंदूशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध शास्त्रांवर आधारीत प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पध्दती परीक्षा काळातील धैर्य, परिक्षा काळातील धैर्य, स्मरणशक्ती वाढविणे, सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न कसे करावेत, याचे मार्गदर्शन केले जाईल. शासनाच्या अटी-शर्तीनुसार मनशक्ती केंद्रामार्फत हा उपक्रम पालिका शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सोनाली गव्हाणे यांनी दिली.