निर्भीडसत्ता न्यूज –
राहत्या घरात स्वत:च्या दहा आणि आठ वर्षाच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१९) ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आलीे.
शुभम दीपक बरमन (वय १०) आणि रुपम दीपक बरमन (वय ८), असे खून झालेल्या मुलांचे नाव आहे. तर, त्यांचे वडील दीपक बरमन (वय ३५, रा. नृसिह कॉलनी, ताथवडे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरमन कुटुंबीय मूळचे पश्चिम बंगालचे आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते ताथवडे येथे राहत होते. दीपक एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. तर, त्यांची पत्नीही एका खासगी कंपनीत नोकरी करतात. घराच्या बाजूलाच दोघांचीही कंपनी आहे. शुभम चौथीच्या वर्गात. तर रुपम तिसरीच्या वर्गात शिकत होता. दोघेही इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत होते.
शाळेला शनिवारी सुट्टी असल्याने शुभम आणि रुपम दोघेही घरीच होते. दुपारी चहाचा ब्रेक झाल्यानंतर दीपक कंपनीतून घरी आले. त्यावेळी त्यांनी शुभम आणि रुपम या दोघांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर दीपक यांनी दोरीच्या सहाय्याने फॅनच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी एकच्या सुमारास दीपक यांच्या पत्नी जेवणासाठी घरी आल्या. तेव्हा दरवाजा ठोठावला तरी आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडला असता दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर, शुभम आणि रुपम मृत अवस्थेत आढळले. दोघांना उपाचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या हत्या व आत्महत्येच्या घटनेमागील नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.