निर्भीडसत्ता न्यूज –
दिव्यांग व्यक्तिंसाठीची मतदान प्रक्रिया अधिक सूलभ होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्नशिल रहावे. मतदानाची टक्केवारी वाढून दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे, यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुलभ निवडणूका’ या विषयावरील आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. वासनिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी सोसे, अदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, पुणे महानगर पालिकेचे निवडणूक उपायुक्त संतोष भोर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. सी. बोरा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रविण आष्टीकर आदी अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती सिंह म्हणाल्या, मतदार केंद्राची ठिकाणे संबंधित अघिकाऱ्यांनी तपासून घ्यावी. दुमजली किंवा अधिक मजल्यांच्या इमारतीत मतदान केंद्र असल्यास दिव्यांगांसाठी तळ मजल्यावरच मतदानाची सोय करण्यात यावी. यासाठी सर्व पातळीवर नोडल अधिकारी नेमण्यात यावेत. तसेच मतदार संघनिहाय दिव्यांग मतदारांची यादी तयार करावी. अवश्यकतेनुसार मतदारांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे. तरूण वर्गाच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी देखील प्रयत्न करावेत. दिव्यांगासाठी विशेष मतदान केंद्राची सोय करता येणे शक्य असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती सिंह यांनी यावेळी सर्व मतदार संघांचा अढावा घेतला. तसेच वृध्द आणि दिव्यांगाना सहजतेने मतदान करण्यासाठी सुविधा देण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सामजिक संस्था तसेच युवकांचा या प्रक्रियेत सहभाग वाढण्यासाठीच्या उपयोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित दिव्यांगांच्या प्रतिनिधींनकडून मतदान करण्यासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती देखील उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी घेतली.