निर्भीड न्यूज –
लहानपणी आई बाबांनी घरी कलेला पोषक वातावरण ठेवले, त्यातूनच माझ्यातील अभिनय फुलत गेला. फूल येणारे झाड असेल तर त्याला खतपाणी घातल्यावर डौल येतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारचे शिक्षण हे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने येथे व्यक्त केले.
चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘नाटक, चित्रपट ते निर्माती प्रवास’ या विषयावर सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. तयारीने घेतलेल्या या मुलाखतीतील प्रश्नांना मुक्तानेही तितक्याच समर्पकपणे उत्तरे दिल्याने मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. या वेळी नगरसेविका आरती चोंधे, अश्विनी चिंचवडे, मुक्ताची आई विजया बर्वे, वडील वसंत बर्वे, गांधीपेठ तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, प्रा. अनिता मोहिते, दिलीप सोनिगरा, प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
ज्या भागात वाढलीस, सायकल घेऊन भटकलीस अशा चिंचवडगावात वलयांकित होऊन येताना काय वाटतय? असा प्रश्न केला असता मुक्ता म्हणाली की, चिंचवड हे माझे घर आहे. घरात शिरताना वलयाच्या चपला बाहेर काढून आत आले. गेल्या पंधरा सोळा वर्षात खूप काही बदललय. पण इथे आलं की लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. गरभ्यात घेतलेला सहभाग, साईनाथ बालक मंदिरातल्या बेलसरे बाई सारे काही आठवू लागते.
नाटक, चित्रपट ते निर्माती या आपल्या प्रवासाविषयी सांगताना मुक्ता म्हणाली की, लहानपणी आई-बाबांनी घरी कलेला वातावरण पोषक ठेवले. अवघी चार वर्षांची असताना आईच्याच ‘रूसू नका फूगू नका’ या नाटकात काम केले. त्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचं’ या नाटकात भूमिका केली. शिक्षण घेऊन प्रोफेशन करणे गरजेचे असल्याचे ध्यायान येऊन तीन वर्ष नाट्यशास्त्राचे धडे घेतले. फूल येणारं झाड असेल तर त्याला खतपाणी घातल्यावर डौल येतो, याचा अनुभव आला. लहान वयात सतीश आळेकर, जब्बार पटेल, विजय मेहता अशी मोठी माणसे भेटली. मात्र पाटी कोरी असल्याने दडपण आले नाही, खूप शिकता आले असे मुक्ता म्हणाली.
पहिलं काम मिळताना अडचण आली नाही. या वर्षी तर डबलसीट चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले. पण हे काम दोन वर्षापूर्वी केलेले असे सांगून मुक्ता म्हणाली की, पहिलं नाटक काही प्रयोग मग ब्रेक, दोन कामांमध्ये सक्तिीची विश्रांती! मात्र विश्रांतीचा काळ हेल्दी घालवायचा. फ्रेश होऊन टवटवीत मनाने पुन्हा कामाला लागावे. या मताची मी आहे. खरे तर हे नटांसाठी परावलंबी क्षेत्र असल्याचे मत मुक्ताने व्यक्त केले. अडचणीतून पुढे जात मोठे कसे व्हायचे हे मीना कुलकर्णी, संजय मोने यांच्याकडून शिकले, असेही ती म्हणाली.
विनय आपटे यांचे ‘डॅडी आय लव्ह यू’, भक्ति बर्वे यांचे ती ‘फुलराणी’, प्रशांत दामलेंची नाटके आपण पाहिली. सुरेखा पुणेकर, शकुंतला नगरकरांच्या लावण्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. सूर्य पाहिलेला माणूस, रणांगण विविध नाटकांमधला डॉ. श्रीराम लागू, गिरीष ओक, मीनाताई कुलकर्णी यांचा अभिनय पाहिला. अभिनेत्याला सर्वांगाने काम करावे लागते हे जाणवले.
हम तो तेरे आशिक है, फायनल ड्राफ्ट, कबड्डी कबड्डी या नाटकांमध्ये काम केले. टीव्हीवरील ‘घडलय बिघडलय’ या मालिकेने आपल्याला वेगळी ओळख दिली. त्यानंतर पिंपळपान, आभाळमाया, या मालिकांमध्ये काम केले. जोगवा, मुंबई – पुणे – मुंबई, डबलसीट या चित्रपटांनी नाव दिले, असे मुक्ता बर्वे हिने सांगितले.
नाट्य-चित्र अभिनेत्री म्हणून स्थिरावत असताना निर्माती कशी झालीस असे विचारले असता, काहीसा वेडेपणा व चांगली माणसं भेटल्याने हे घडून आल्याचे तिने सांगितले. डबलसीट या चित्रपटात आपल्याला तोंडी आलेल्या ‘एकदा उडी मारून तर बघ’ या डायलॉगची आठवण तिने करून दिली. नाटक करताना नटांना ‘कम्फर्टेबल’ ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा मुक्ताने व्यक्त केली.
मिलिंद जोशी, मनीषा जोशींसह कवितांच्या कार्यक्रमाचे केलेले 36 प्रयोग हा ही वेगळा अनुभव असल्याचे मुक्ताने सांगितले. निळू फुले, विक्रम गोखले, नसरूद्दिन शहा, स्मिता पाटील यांचा अभिनय आपण पाहिला. एकूणच कलाकार हा भूमिकेला शरण जातो. कलाकृतिपेक्षा मोठे होण्याचा त्याचा अट्टहास नसतो, असे मत मुक्ताने व्यक्त केले. अरूण सरनाईक, रंजना व श्रीदेवीचा अभिनय आपल्याला नेहमीच भावला असे ती म्हणाली.
जग फास्ट होत आहे, व्हास्ट होत आहे. सैराट या चित्रपटाने विक्रम मोडले आहेत, मात्र सैराट सुरु असेल तेव्हा नाटक आणताना खूप काम करावे लागणार आहे असे मुक्ता म्हणाली. सिनेसृष्टीत यश मिळाले की, एकदम ऑफर येऊ लागतात. सैराटमधल्या आर्चीचे कदाचित असेच होईल. मात्र तिने आपले शिक्षण पण पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मुक्ताने व्यक्त केले. चित्रपटसृष्टीत खूप पैसा आहे, असे लोकांना वाटते. पण तसे नाही, कष्ट करू तेवढाच पैसा मिळतो, असे मुक्ता म्हणाली. मराठीत नाव कमावल्यावर हिंदी चित्रपटांनी खूणावले नाही का? असा प्रश्न केला असता छोट्या भूमिकांमागे मी धावले नाही, असे तिने सांगितले.