निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपच्या एका नगरसेविकेला उद्देशून मी ‘96 कुळी शेतकरी’ आहे, असे म्हणणे हे जातीवादी वक्तत्व आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात असे वक्तत्व पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेसला शोभत नाही. राष्ट्रवादी आता जातीवादी पक्ष झाला आहे, अशी टीका करून भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा निषेध केला.
सत्तारूढ पक्षनेते दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विकास डोळस, बाबासाहेब त्रिभुवन, लक्ष्मण उंडे, नामदेव ढाके, नगरसेविका सीमा सावळे, उषा मुंढे, सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.
नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, एका पिवशीत ९ ते १० कुत्र्यांची पिल्ले भरून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आणली. त्याच्यावर कारवाई व्हावी, ही मागणी नगरसेविका सावळे यांनी केली. त्यावर त्यांना उद्देशून 96 कुळी शेतकरी हे जातीवादी शब्द त्यांनी उच्चारले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरोगामी आहे. मात्र, ते सत्ताधार्यांना जातीवरून बोलत आहेत. हे वर्तन निषेधार्थ आहे.
उषा मुंढे म्हणाल्या की, स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपने सलग दोन टर्म मागासवर्गीय नगरसेविकेला संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबद्दल जातीवादी वक्तव्य करीत आहे. त्यातून राष्ट्रवादी जातीवादी असल्याचे दिसत आहे.
ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यानी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. लक्ष्मण उंडे म्हणाले की, सभागृहात सर्व सदस्य एकसमान असतात. सभागृहात जातीवादी उल्लेख करणे हा सभागृहाचा अपमान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ढोंगीपणाचा कळस गाठला आहे. एका विशिष्ट समाजाचा उल्लेख करून टीका करण्याचे वर्तन निषेधार्थ आहे. विरोधी पक्षनेत्याचे गेल्या 8 ते 10 दिवसांतील वर्तन निव्वळ स्टंटबाजीतून होत आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर मोकाट कुत्री व डुक्कराचा विषय नसताना सभागृहात त्यावर चर्चेस सहमती दिली. भाजपच्या काही नगरसेवकांनी त्यासंदर्भातील समस्या व तक्रार सभेत मांडल्या. तो शब्द सभा कामकाजातून वगळण्याची मागणी आम्ही केली.
एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते