जावली | करहर
निर्भीडसत्ता न्यूज –
कुडाळ-पाचगणी या प्रमुख जिल्हा मार्गावर महू गावाजवळच्या नवीन पुलाचे काम सुरु असल्याने आज शुक्रवार दि. 28 ते रविवार दि. 30 सप्टेंबर या कालावधीत कुडाळ-पाचगणी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता कृष्णात निकम यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जावली तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे, दुरुस्ती प्रगतीपथावर आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या कुडाळ-पाचगणी रस्त्यावरील करहरच्या पुढे महू गावाजवळ जुना बिटिशकालीन पूल होता त्याची आयुष्य मर्यादा संपल्याने त्या ठिकाणी नवीन आर्चपुल बांधण्याचे काम जोमाने सुरु आहे. सद्यस्थितीत फाउंडेशन व सबस्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे.
आर्च ब्लॉक्स बसवण्याचे काम क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार दि. 28 ते रविवार, दि. 30 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत सुरु राहणार आहे. अशा वेळी सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवणे धोकादायक असल्याने या तीन दिवसासाठी कुडाळ-पाचगणी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी रस्ता वापरावा व शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णात निकम यांनी केले आहे.