निर्भीडसत्ता न्यूज –
लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्व शांती विदयापीठाचे विश्व शांती सभागृह (वर्ल्ड पीस डोम) आणि विश्व शांती ग्रंथालय पाहून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. आज राज्यपालांनी जागतिक शांतता घुमटाला भेट देऊन पहाणी केली. त्यांच्यासमवेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही उपस्थित होते.
जागतिक शांतता घुमटाचे नुकतेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती उद्घाटन झाले. आज राज्यपाल राव यांनी घुमटाची उत्सुकतापूर्वक पहाणी केली. राहुल कराड आणि डॉ. मंगेश कराड यांनी घुमटाच्या निर्मितीमागची प्रेरक कहानी सांगितली. सन 2005 साली या विश्वशांती प्रार्थना सभागृहाच्या कामाला सुरूवात झाली. जगभरातील संत, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचे पुतळे या सभागृहाच्या परिसरात उभारण्यात आले असून त्या पुतळ्यांची पहाणीही राज्यपाल राव यांनी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी राज्यपाल राव तसेच अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे घुमटाची प्रतिकृती देऊन स्वागत केले.
यावेळी एमआयटीचे कुलगुरू इंद्रकुमार भट, डॉ. सुधीर गव्हाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम तसेच विविध धर्माचे अभ्यासक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.