मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात ही घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्याच्या उमेदवारीची घोषणा संध्याकाळपर्यंत करण्यात येईल असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे. तर यावेळी बोलताना खर्गेंनी विरोधकांवरही टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर पुण्याच्या जागेचा तिढा अद्याप संपला नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का, याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
कोण आहेत प्रवीण गायकवाड?
– शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड यांचे थेट वंशज.
– पुण्यातील मुंढवा हे मूळ गाव
– कराड गव्हर्नमेंट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीयरिंग
– सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
– 65 पेक्षा जास्त देशांचे अभ्यास दौरे
– 29 पेक्षा जास्त देशात शिवजयंती साजरी करण्यात महत्वाचा वाटा
– गेली 25 वर्षं सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख
– संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष
– शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस
– मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक
प्रवीण गायकवाड यांचा गेल्या 25 वर्षातील प्रवास
– पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची मोठी फळी
– परदेशात intellectual class सोबत जिव्हाळ्याचे संबंध
– केवळ मराठा नाही तर मुस्लिम, दलित-ओबीसी आणि युवकांना आपलासा वाटणारा चेहरा
प्रवीण गायकवाड हे काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून लढतील या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. पण निवडणूक तोंडावर आली तरी काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे वैतागून अखेर आपण उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचं गायकवाड यांनी जाहीर केलं होतं.
पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा मोठा घोळ झाला होता. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी नवेच नाव समोर आलं होतं. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यताही समोर आली होती. खुद्द रेखा पुणेकर यांनीच तसे संकेत दिले होते. त्यामुळे पुण्यात गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर यांच्यात सामना रंगणार अशीही शक्यता निर्माण झाली होती.
याबाबत न्यूज18 लोकमतशी बोलताना सुरेखा पुणेकर यांनी खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘दिल्लीत जाऊन मी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. ते मला कळवणार आहेत. पण मी कुणाला भेटले ते सांगणार नाही. कालपर्यंत काँग्रेसचे महापालिकेतले गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव निश्चित झालं अशीही चर्चा होती.