निर्भीडसत्ता न्यूज –
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षिणी सुस्वरे आळविती.. असं संत तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय.आपल्याकडेच नव्हे तर जगातल्या सगळ्याच महानगरांमध्ये काँक्रीटची जंगलं उभी राहिल्याने खरीखुरी वनसंपदा हद्दपार झालीय. मग कधीतरी झाडं लावण्याची टूम निघते आणि वनीकरण म्हणून स्वतःचीच पाठ थोपटायला एक समारंभ मिळतो.पण सिनेमाच्या माध्यमातून हा विचार पोहचवण्याची कल्पना सुचली ती लेखक,दिग्दर्शक अखिल देसाई यांना आणि त्यांनी साज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निर्माते सुरेश ढोरे यांनी विरा क्रिएशन निर्मित ‘सीडबॉल्स’ या मराठी सिनेमाची निर्मिती करण्याचे ठरवले. सीडबॉल्स नावाप्रमाणेच सिनेमाची गोष्ट पर्यावरणावर आधारित आहे, तेव्हा या सिनेमाचा मुहूर्त आणि वेबसाईट प्रकाशन देखील या क्षेत्रात काम करणाऱ्या सच्च्या माणसाकडून व्हावी यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणपासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवली या गावातल्या नंदू तांबे यांनी स्वत:च्या मालकीच्या सुमारे ३२ एकरांच्या जंगलाला ‘खासगी अभयारण्य’ म्हणूनच घोषित केलं आहे. हा माणूस गेली अनेक वर्षे तटस्थपणे सुमारे ३२ एकरांचं जंगल जपण्याचं आणि वाढविण्याचं काम करतोय. त्यांचं खरं नाव आहे निशिकांत तांबे; पण त्यांना ओळखणारी सगळी माणसं ‘नंदू तांबे’ याच नावाने ओळखतात.प्रसिद्धी पासून दूर राहून हा व्यक्ती पर्यावरणाचे काम अहोरात्र करतोय.त्यांचा सन्मान म्हणून त्यांच्याच हस्ते त्यांच्याच जंगलात जाऊन सीडबॉल्स सिनेमाचा मुहूर्त आणि वेबसाईट प्रकाशन करण्यात आला.
लेखक दिग्दर्शक अखिल देसाई यावेळी म्हणाले कि, मनोरंजन तर प्रत्येक सिनेमातून होतच असते परंतु सामाजिक भान ठेवत त्याला मनोरंजनाची जोड देऊन एक चांगला विचार प्रेक्षकांना दिला तर ती कलाकृती खऱ्या अर्थाने अजरामर होते. म्हणून सीडबॉल्स सिनेमाचा मुहूर्त आम्ही अशा पर्यावरण प्रेमी माणसाच्या हस्ते केला. पुढील महिन्यापासून आम्ही सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. कमलेश सावंत, सायली गावकर, आकाश वखरे, चारू देसले, कृपा झुंझारराव, रूद्र ढोरे, प्रशांत नगरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.