निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विक्रम पिल्ले अॅकॅडमी सहकार्याने आयोजित उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप शनिवारी (दि.1) झाला. शिबिरातील उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
पालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे कार्यक्रम झाला. समारोप कार्यक्रमास पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त आशा राऊत, ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले, आंतरराष्ट्रीय खेळाडू विकास पिल्ले, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, राष्ट्रीय पंच श्रीधरण तंबा, अधिकारी, पंच, प्रशिक्षण व पालक आदी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, खेळाडूंनी जिद्द आणि कष्टाळू वृत्तीने नियमितपणे सराव करावा. ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले यांचा आदर्श समोर ठेवून शहरातून अनेक असे ऑलिम्पिक हॉकीपटू तयार झाले पाहिजेत. पालिकेकडून हॉकी खेळासाठी सर्व प्रकाराचे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन, अनुभवी प्रशिक्षक नेमले जाणार आहेत. त्याचा लाभ शहरातील नवोदीत खेळाडूंनी घ्यावा. सहायक आयुक्त राऊत म्हणाल्या की, शहरातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकीपटू तयार झाले पाहिजेत. खेळाडूंना जी काही मदत लागेल, ती पालिकेडून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. क्रीडा पर्यवेक्षिका अनिता केदारी यांनी सुत्रसंचालन केले.
दरवर्षीप्रमाणे शिबिर 1 मे ते 1 जून असे महिनाभर घेण्यात आले. शिबिरात 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुलींनी सहभाग घेतला. सकाळ व संध्याकाळ असे दोन सत्रात खेळाडूंना ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले व राष्ट्रीय प्रशिक्षकांनी हॉकीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले.