निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
महापौर चषक ‘टिन 20’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा शासदार समारोप रविवारी (दि.2) झाला. म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या गटात उद्यमनगर, पिंपरीच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाने आणि खासगी शाळांच्या गटात निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालय संघाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रीडा विभागाच्या वतीने स्पर्धा 20 जानेवारी ते 2 फेबु्रवारी या कालावधीत शहरभरात घेण्यात आल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, राजू मिसाळ, विकास डोळस, सागर गवळी, नामदेव ढाके, नगरसेविका सुषमा तनपुरे, आरती चोंधे, अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, तसेच, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, हिंद केसरी पैलवान अमोल बुचडे, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग, पार्श्वगायक संदीप उबाळे, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, प्रशासन अधिकारी सुनंदा गवळी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, जलतरण, कुस्ती, बुद्धीबळ, योगासन, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, स्केटींग, थ्रो बॉल, योगा, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कराटे, मुष्टियुद्ध, किक बॉक्सिंग, तायक्वांदो या 20 खेळांचा समावेश होता. स्पर्धेत 19 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरूवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. सर्व प्रथम निगडीच्या सी.एम.एस. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर पिंपळे सौदागरच्या अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘गजर विठू माउलीचा’ हे गीत सादर केले. केंब्रीज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘माँ तूझे सलाम’ या गीतावर स्केटींग नृत्य सादर करुन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मनोज देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतील मल्लखांब या खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
राम रैना, अक्षय मोरे व दत्तात्रय जगताप यांनी सुत्रसंचालन केले. पार्श्वगायक संदिप उबाळे यांच्या छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या शीर्षकगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
खेळावर माझे प्रेम : रामदास आठवले
मी स्वत: खेळाडू असल्याने मला खेळाबद्दल विशेष आस्था आहे. त्यामुळे मी विद्यार्थी-खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. महापौर उषा ढोरे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख आहे. यापुढे ही नगरी सांस्कृतिक व क्रीडानगरी म्हणूनही ओळखली जाईल. उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, आंतरशालेय विद्यार्थ्यांनी गेल्या 20 दिवसांपासून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेत चुरस व रंगत आली.