पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरावर कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. बुधवारी (दि.22) एकाच दिवशी विक्रमी संख्येने 927 कोरोनाबाधित रूग्ण शहरात सापडले. ही आतापर्यंतची बाधितांची सर्वांत मोठी आकडेवारी आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वेगात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 13 हजार 993 वर पोहचला आहे. पालिकेच्या वायसीएम व भोसरी रूग्णालय, कोविड केअर सेंटर आणि खासगी रूग्णालयात एकूण 3 हजार 379 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रूग्णालयात 51 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.
तर, 10 पुरूष व 5 महिलांचा असे एकूण 15 जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळेवाडी येथील 60 वर्षीय महिला, नेहरूनगर येथील 75 वर्षीय महिला आणि 60 वर्षीय पुरूष, आकुर्डी येथील 62 व 63 वर्षीय 2 पुरूष, थेरगाव येथील 56 वर्षीय पुरूष, वाल्हेकरवाडी येथील 50 वर्षीय महिला, पिंपळे गुरव येथील 75 वर्षीय पुरूष, पुनावळे येथील 38 वर्षीय तरूण, मोरवाडी येथील 68 वर्षीय पुरूष, रहाटणी येथील 43 व 58 वर्षीय 2 पुरूष, जुन्नर येथील 80 वर्षीय महिला, चाकण येथील 49 वर्षीय पुरूष आणि पुण्यातील स्वारगेट येथील 56 वर्षीय महिला (56) यांचा मृत्यू झाला.