पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मध्यवर्ती भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे व कर संकलन विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांची उपायुक्तपदी वर्णी लागणार आहे. तसा पत्रव्यवहार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य शासनाकडे केला आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येताना उपायुक्त म्हणून मंगेश चितळे व स्मिता झगडे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, महापालिकेचे सहायक आयुक्त हे पद अस्तित्वात नव्हते. आता उपायुक्तांच्या 7 पदांना शासनाने नव्या आकृतीबंधात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार शासनाच्या प्रतिनियुक्तीवर सुभाष इंगळे हे पहिले उपायुक्त म्हणून नुकतेच महापालिकेत रूजू झाले आहेत.
उपायुक्त हे पद अस्तित्वात आल्याने सहायक आयुक्त चितळे व झगडे यांनी उपायुक्त या पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यानुसार आयुक्त हर्डीकर यांनी राज्य शासनाकडे पत्र पाठवून या दोन्ही सहायक आयुक्तांना उपायुक्त पद देण्याच्या तांत्रिक बदलास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. शासनाची मंजुरी मिळताच पालिकेला आणखी दोन उपायुक्त लाभणार आहेत.