पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अपुर्या गॅस पुरवठ्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या झालेल्या मृत्यूला महापालिकेचा वैद्यकीय विभाग तसेच ठेकेदार व वायसीएम रुग्णालयातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप उपमहापौर तुषार हिंगे यांनी केला आहे.
रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, व ऑक्सीजन पुरवठा करणार्या यंत्रणेचे सात दिवसांच्या आतमध्ये ऑडीट करावे, अशी मागणी हिंगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत उपमहापौर हिंगे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयात घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे रुग्णांचा जीव गेल्यानंतरही ठेकेदाराला वाचविण्याचा सुरू असलेला प्रकार खपवून घेतला जाणार नाही. वायसीएम रुग्णालयातील आक्सीजन पुरवठा करणारी पाईपलाईन ही मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) मानांकनानुसार नसल्याची बाब मी स्वत: जानेवारी 2020 मध्ये आपल्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतरही केवळ संंबंधित ठेकेदार पोसण्यासाठी आपण कोणताही निर्णय घेतला नाही.
एमसीआयच्या मानांकनानुसार पाईपलाईन असती तर बुधवारी (दि.22) घडलेली घटनाच घडू शकली नसती. आपल्या प्रशासकीय यंत्रणेेने केलेल्या दूर्लक्षामुळे अनेकांचा जीव जाण्याचा प्रकार घडला. यामध्ये तात्काळ सुधारणा न केल्यास यापुढेही अशी दूर्घटना घडण्याची भिती आहे. त्यामुळे सध्या पुरवठा सुरू असलेल्या ऑक्सीजन पाईपलाईनचे सात दिवसांच्या आतमध्ये ऑडीट करावे तसेच एमसीआच्या मानांकनानुसार ऑक्सीजनची पाईपलाईन तात्काळ टाकण्यात यावी. आपण तात्काळ हा निर्णय न घेतल्यास आणि ऑक्सीजनच्या चुकीच्या पुरवठ्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला आपण आयुक्त या नात्याने जबाबदार रहाल आणि होणार्या परिणामांना आपणास सामोर जावे लागेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.