निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंर्गत पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीत एसआरए योजना राबविण्याचा प्रस्ताव विरोधकांनी आरोप केल्याने दप्तरी दाखल करण्यात आला.सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी माई ढोरे होत्या. एसआरए विभागाऐवजी महापालिका स्वत: गांधीनगर झोपडपट्टीत ती योजना राबवित आहे. त्यासाठी एकूण 508 कोटी 90 लाख खर्च आहे. जागामालकास 50 टक्केप्रमाणे सुमारे 124 कोटी 49 लाख रूपये दिले जाणार आहेत. त्यावरून सत्ताधार्यांसह विरोधकांनी भाजपला लक्ष केले.
शिवसेनेचे नीलेश बारणे म्हणाले की, एसआरए नियमानुसार जागामालकास 25 ऐवजी 50 टक्के मोबदला देण्यामागे प्रयोजन काय आहे. हा प्रकार पालिका विकायला काढण्याप्रमाणे आहे, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल म्हणाले की, हा पालिकेवरील दरोडा आहे. धंदा करणे हा पालिकेचे काम नाही. गांधीनगरचा हट्ट कोणासाठी धरला जात आहे. भाजपचे कोण या प्रकल्पात आहेत, हे स्पष्ट करावे, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले की, कोणत्या नियमानुसार पालिका एसआरए योजना स्वत: राबवित आहे. शहरातील 71 पैकी हीच का झोपडपट्टी निवडली. विठ्ठलनगर व यशवंतनगरप्रमाणे नियम येथे का लावले जात नाहीत. पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना जागामालकास अधिकचा मोबदला देणे म्हणजे पालिकेची लुट आहे, असा आरोप त्यांनी केला. जागामालकास अधिकचा मोबदला देणे हा प्रकार शंकास्पद आहे. याचा पुर्नविचार झाला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी व्यक्त केले.
भाजप नेत्याला व जागामालकास डोळ्यासमोर ठेऊन गांधीनगरचा प्रकल्प राबविला जात आहे. अधिकार्यांनी भाजपसाठी की भाजपने अधिकार्यांसाठी ही योजना आणली आहे, असा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला.
गोरगरीबांना हक्काची घरे मिळावीत म्हणून योजना : नामदेव ढाके
गरीबांसाठी ही एसआरए योजना राबविली जात आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नियोजन केले आहे. हा विषय दप्तरी दाखल करावा, अशी सूचना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महापौरांना केली. भाजप किंवा कोणा व्यक्तीस बदनाम केले जाऊ नये. कोणाच्या दिव्याखाली किती अंधार आहे, हे सर्वांना माहित आहे, असे सांगत तो विषय दप्तरी दाखल करण्याचे आदेश महापौर माई ढोरे यांनी दिले.