पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार फेबु्रवारी 2022 ला होत आहे. प्रभागासाठी 40 हजारांची लोकसंख्या निश्चित केली आहे. मात्र, प्रत्येक जागेनुसार म्हणजे अ, ब आणि क नुसार लोकसंख्या जाहीर करावी, अशी मागणी अॅड. सतीश कांबिये यांनी महापालिकेकडे नोटीशीद्वारे केली आहे.
या संदर्भात यांनी आयुक्त राजेश पाटील यांना नोटीस दिली आहे. अॅड. कांबिये यांनी नोटीशीमध्ये म्हटले आहे की, आगामी निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनाचा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेच्या निवडणुक विभागाने सुरू केले आहे. एका प्रभागात सुमारे 36 ते 44 लोकसंख्या असणार आहे.
सन 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्या लोकसंख्येच्या आधारे 128 जागांसाठी 43 प्रभागांची रचना केली जाणार आहे. मात्र, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये त्या प्रभागातील एका जागेसाठी किती लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे, ती माहिती देण्यात आलेली नाही. ती बाब महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 5 उपकलम 2 (अ) एंट्री (3) तक्तामध्ये नमूद केलेल्या तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक जागेकरीता किती लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे, त्याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी.