पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्लास्टिक बंदी राबवण्यात येत आहे. नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी शहरामध्ये ३२ ठिकाणी व्हेंडिंग मशिन लावण्यात येणार आहे. यामध्ये पाच रुपयांचा कॉईन टाकल्यावर नागरिकांना कापडी पिशवी मिळणार आहे.
शहरामध्ये नागरिकांना कापडी व पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. त्यामधील कापड वेगळे करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनाही घरातील जुने कपडे घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापासून कापडी पिशव्या तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या वतीने थेरगाव व भोसरी येथे शिलाई मशिन देऊन बचतगटांना काम दिले आहे.
या कापडी पिशव्या नागरिकांना सहज उपलब्ध होण्यासाठी शहरातील ३२ प्रभागांमध्ये व्हेंडिग मशिन लावण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच व दहा रुपयांचा कॉईन टाकल्यानंतर कापडी पिशवी मिळणार आहे. सुरूवातील ३२ प्रभागांमध्ये हे मशिन बसवण्यात येणार आहे.