पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पे अॅण्ड पार्क योजना सुरू केली. मात्र, वाहनचालकांकडून पैसे दिले जात नसल्याने तसेच, वाहतुक पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने अखेर, परवडत नसल्याने संबंधित ठेकेदाराने कामाच्या ठेक्यातून माघार घेतल्याचे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे.
पालिकेने पे अॅण्ड पार्क योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहरातील 396 ठिकाणी पे अॅण्ड पार्क योजना सुरू करण्यासाठी पालिकेने रस्ते रंगरंगोटीसह शेकडो फलक लावले. वाहतुक पोलिसांना टोईंग व्हॅन देण्यात आले. त्यावर खर्च करण्यात आला.
सुरूवातीला शहरातील 80 ठिकारी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नगरच्या निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. मात्र, वाहनचालक वाहन लावल्यानंतर पैसे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, नागरिक उद्धटपणे बोलत शिवीगाळ करत असल्याचे प्रकारही घडले आहेत. दुसरीकडे, वाहतुक पोलिस बेशिस्त वाहनांवर कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. काही मोजके रस्ते सोडले तर, वाहतुक पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे बेशिस्तपणे वाहन लावण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, वाहनचालक शुल्क देत नाहीत. परिणामी, ही योजना मोजक्याच रस्त्यांवर रडतखडत सुरू होती. परवडत नसल्याने संबंधित ठेकेदाराने कामाच्या ठेक्यातून माघार घेतल्याचे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे.