पिंपरी| निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या चिखली करआकारणी व करसंकलन कार्यालयात ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असा कारभार सुरुच आहे. कुदळवाडीत तीन वर्षापासून सुमारे 45 ते 50 रहिवाशी खोल्यांच्या मिळकतीची नोंद करण्यात आली नाही. त्या मिळकतीच्या तक्रारीनंतर नोंद करताना मृत व्यक्तीच्या नावे मालकी दाखवत करआकारणीची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील जागा प्राधिकरणाच्या मालकीची असून त्या जागेचे सातबारा उतारा, खरेदीखत सादर केलेले नाहीत, भोगवटादार म्हणून वारसाची नोंद करताना ‘कोर्ट वारस प्रमाणपत्र ‘ नसताना देखील संबंधित अधिका-यांनी अर्थपुर्ण देवाण-घेवाणीनंतर राजकीय दबावापोटी मंडलधिका-यांनी चुकीची नोंद लावण्यात आली आहे.
चिखली करआकारणी व करसंकलन कार्यालयातंर्गत कुदळवाडीतील गट नंबर 794 मध्ये मोकळ्या जागेत सुमारे 45 ते 50 खोल्या बांधल्या आहेत. त्या सर्व खोल्या नागरिकांना भाडोत्री दिल्या आहेत. सदरील जागा ही सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूलची असून त्या शाळेच्या पटागंणावर ह्या खोल्या अनधिकृतपणे बांधून भाड्याने दिलेल्या आहे. त्या शाळेच्या संस्थाचालकाने तब्बल तीन वर्षापासून सर्व खोल्या भाड्याने देवून त्याचे भाडे वसूल करत आहे. मात्र, त्या खोल्यांच्या मिळकतीची चिखली करसंकलन कार्यालयात नोंद केली नव्हती. तसेच त्या संस्थाचालकाने कोणताही कर भरलेला नाही. गेली तीन वर्ष चिखलीतील अधिका-यांच्या आशिर्वादाने सर्व कारभार सुरु होता.
याबाबत त्या खोल्याच्या मिळकतीची नोंद करुन करआकारणी करण्याची तक्रार एमआयएमचे धम्मराज साळवे यांनी केली. त्यानंतर चिखली कार्यालयातील अधिका-यानी संस्थाचालकाना नोटीस बजावून, त्या अनधिकृत बांधलेल्या खोल्याचे मोजमाज घेत त्या मिळकतीची नोंद करण्यासाठी कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानूसार सदरील जागा नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीची आहे. त्या जागेची खरेदी 1995 रोजी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या जागेच्या मिळकतीची नोंद करण्यासाठी नोटीसद्वारे खरेदीखत आणि सातबारा उतारा मालकाकडे मागण्यात आला. तसेच सुनावणी देखील घेण्यात आली. त्यात इमारत बांधलेला जागेचा सिटी सर्व्हे उतारा, भाडे करारनामे कागदपत्र, बांधकाम मंजूर केलेला नकाशा, जागा मालकी हक्काची कागदपत्रे, इतर काही मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले.दरम्यान, सदरील जागा नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीची होती. त्या जागेबाबत खरेदीखत, सातबारा उतारा आणि अन्य मालकी हक्काची कागदपत्रे सादर केले नाहीत. त्या मिळकतींवर करआकारणी करताना 17 आॅक्टोबर 2022 रोजी अर्ज घेवून 23 नोव्हेंबर 2022 पासून मिळकतकराची नोंदी करण्यास सुनावणी घेण्यात आली. त्यात सर्व खोल्यांचे मोजमाप करुन 17 हजार 044 चौरस फूटानूसार आकारणी करण्यात येणार होती. मात्र, त्या मालकाला सुट देवून 11 हजार 670 चौरस फुटाची निवासी म्हणून करआकारणी केली आहे. त्यानूसार 2 लाख 35 हजार 505 रुपये कर आकारणी करण्यात आला आहे.
कुदळवाडीतील गट नंबर 794 मधील जागेच्या मिळकतीवर करआकारणी करण्यासाठी सुनावणी घेण्यात आली. त्या जागेची मालकी प्राधिकरणाची आहे. त्यावर खरेदीखत व सातबारा उतारा, इतर मालकी हक्क कागदपत्रे मागण्यात आली. मात्र, संबंधित मालकीकडून ती उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे मालकी हक्काची नोंद न करता भोगवटादार म्हणून नोंद केली आहे.
नाना मोरे प्रशासन अधिकारी,
चिखली करसंकलन कार्यालय