दिल्ली । निर्भीडसत्ता न्यूज
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित केला होता. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. आता आज सकाळी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० ते ७० आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला. बीबीसी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत. कर्मचाऱ्यांनी घरी जावे असे सांगण्यात आले आहे. लंडनमधील बीबीसीच्या जागतिक मुख्यालयाला छापेमारीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मात्र आयकर विभागाने यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. तर दिल्ली आणि मुंबई बीबीसीचे ऑफिस पूर्णपणे सील करण्यात आले आहे.