पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या नगर सचिव विभागाला बहुतांश प्रक्रिया स्वयंचलित करण्यात मदत होण्यासाठी म्युनिसिपल सेक्रेटरी मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे नगर सचिव विभागाच्या मुख्य लिपिक, लिपिक, कॉम्पुटर ऑपरेटर आदी कर्मचार्यांना जीआयएस संगणक प्रणालीचे धडे देण्यात आले. यामध्ये, विषयपत्र निर्मिती आणि त्याची मंजुरी, अजेंडा अहवाल, मीटिंग कॅलेंडर, अहवाल वितरण, बैठकीचे वृत्तांत, अहवाल तयार करणे, प्रकाशन करणे, नगरसेवकांचे मानधन, डॅशबोर्डबाबत 130 हून अधिक लिपिक, वरिष्ठ लिपिक, संगणक परिचालक आदींनी प्रणालीची माहिती घेतली.
पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात नगरसचिव विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना जीआयएसचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, उज्ज्वला गोडसे, दीपक पवार आदी उपस्थित होते. प्रकल्प सल्लागार कल्पेश बोंडे, ऋषी मौर्य यांनी जीआयएस प्रक्रीयेबाबत माहिती दिली.
जीआयएस प्रकल्पांतर्गंत महापालिकेच्या विविध विभागांच्या स्वयंचलित कार्यप्रणालीसाठी 33 आयटी सॉफ्टवेअर्स एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये, नागरिकांचा सहभाग व पारदर्शक प्रशासन, जी.आय.एस. प्रणालीद्वारे महापालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. नागरिकांना भविष्यातील होणारे फायदे लक्षात घेवून जी.आय.एस.प्रणाली राबविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे महानगरपालिका नगर सचिव विभागाद्वारे सूरू असलेली कार्यप्रणाली यामध्ये, डॉकेट तयार करणे, अजेंडा तयार करणे, नगरसेवकांचे मानधन, स्थायी समितीची बैठकीची कार्यवाही, सर्वसाधारण सभा डिजीटल करणे इ. प्रक्रिया स्वयंचलित पध्दतीने राबविण्यास मदत होणार आहे.