पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील जुन्या कागदपत्रे, दस्तऐवज व रजिस्टरमधील नोंदी तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 359 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे व दस्तऐवज तपासणीचे काम येत्या शुक्रवार (दि.24) पर्यंत करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन 1948 ते 1967 या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात येत आहेत. महापालिकेच्या शिक्षण, कर संकलन वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदीच्या तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत वैद्यकीय विभागातील 2 हजार 22 आणि कर संकलन विभागातील 11 हजार 183 कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही मराठा-कुणबी नोंद आढळून आलेली नाही. तर, शिक्षण विभागात सर्वांधिक 5 लाख 83 हजार 832 नोंदी तपासण्यात आल्या. त्यात 2 हजार 359 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्या संदर्भातील अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येत आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेतील विविध विभागातील सन 1948 ते 1967 या कालावधीतील कागदपत्रे व नोंदीची तपासणी करण्यात येत आहे. या कालावधीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1948 पूर्वीच्या नोंदी तपासण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी शुक्रवार (दि.24) पर्यंतची मुदत संबंधित विभागांना देण्यात आली आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त व नोडल अधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले.