पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
आर्थिक वर्ष संपण्यास 38 दिवस बाकी असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातर्फे थकीत कर वसुलीसाठी अतिशय धडाकेबाज निर्णय घेण्यात येऊ लागले आहेत. 1 लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्यांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. मालमत्ता जप्ती संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले जाणार असून रिक्षाव्दारे थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचा मोठा निर्णय कर संकलन विभागाने घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी त्वरित थकीत आणि चालू कर भरून आपली कुप्रसिद्ध टाळावी. महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 24 मालमत्तांचे मुल्यांकन ठरवून लिलाव समितीसमोर नुकताच प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यावर आठवड्याभरात मान्यतेचा निर्णय होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 15 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. आतापर्यंत तब्बल 773 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, 1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची टीम झपाटून कामाला लागली आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 38 दिवस बाकी आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सुक्ष्म पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे.
कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने आत्तापर्यंत जप्ती मोहीम, नळ कनेक्शन बंद करणे या सारख्या कठोर कारवाया सुरू असतानाच आता प्रत्येक झोनमधील बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करताना काढण्यात येणारे व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
त्याचबरोबर सद्य स्थितीत चालू कर आणि थकीत कर भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये रिक्षावर स्पीकर लावून जनजागृती केली जात आहे. मात्र, जनजागृती करूनही आणि विशेष म्हणजे कर भरण्याची क्षमता असूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे स्पीकरव्दारे जाहीर केली जाणार आहेत.