निर्भीड न्यूज
अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड महानगर शाखेच्या वतीने आदर्श माता, उद्योजिका आणि सुवर्ण सोबत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवार, दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
लेखिका, कवयित्री आश्लेषा महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर, संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, संस्थेचे शहराध्यक्ष विजय शिनकर, महिला शहराध्यक्षा रत्नप्रभा धुळकर आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
समाजातील अनेक जणांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. अशा यशस्वी व्यक्तींना घडविणा-या मातांना आदर्श माता या पुरस्काराने संस्थेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. यासह समाजात अनेक महिलांनी उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. अशा यशस्वी उद्योजक महिलांना उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांनाही ‘सुवर्ण सोबत’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळ्यानिमित्त महिलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे. महिलांनीच या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून, या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महिलांनी रोख स्वरूपात मोठी देणगीही दिली आहे.यावेळी प्रा. उदय पाटकर प्रसाविक करणार आहेत. समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.