पिंपरी- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे क्षयरुग्ण शोधमोहीम आणि जनजागरण कार्यक्रमाची सुरुवात झाली. 15 दिवस चालणा-या या मोहिमेत शहरातील 15 झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच क्षयरोगाबाबत जनजागरण देखील करण्यात येणार आहे.
नेहरूनगर, विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीत या मोहिमेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी माजी महापौर हनुमंतराव भोसले, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. पवन साळवी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, राजेंद्र भोसले, आनंद सूर्यवंशी, माजी अध्यक्ष भाऊसाहेब पांगारे, चंद्रू चंदाणी, सदाशिव काळे, लक्ष्मण जोगदंड आदी उपस्थित होते.
क्षयरुग्ण शोधमोहिमेत लोकमान्य होमिओपॅथिक महाविद्यालय, मोरया इन्स्टिट्यूट, तालेरा रुग्णालय यांसारख्या संस्थांचे 60 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून घरोघरी जाऊन क्षयरोग रुग्णांची शोधमोहीम करणार आहेत. आज (सोमवार, दि. 17) पासून 31 जुलैपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये एखाद्या रुग्णास क्षयरोग आढळून आल्यास त्याची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. मोहिमेत सहभागी होणा-या स्वयंसेवकांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे असल्याने आवश्यक ती काळजी रोटरीच्या वतीने घेण्यात आली आहे. रुग्णाच्या थुंकीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी आवश्यक साधनांची बॅग रोटरीमार्फत पुरविण्यात आली आहे.